
मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने बिगर गांधी कुटुंबाचा सदस्य काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे. काँग्रेस हा 137 वर्षे जुना राष्ट्रीय पक्ष आहे. देशभरात आजही त्याची पाळेमुळे रुजलेली आहेत. तो आज कमकुवत असला तरी त्याची ‘शक्तिस्थळे’ शाबूत आहेत. खरगे यांना ती अधिक मजबूत करावी लागतील. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने काँग्रेस पक्षाचे देशभरातील कार्यकर्ते, परंपरागत मतदार यांच्यात निर्माण झालेला विश्वास ही शिदोरी खरगे यांना आव्हाने पेलण्याचे बळ देईल. प्रदीर्घ काळ देशाची राजशकट सांभाळलेल्या काँग्रेस पक्षासाठी सध्याचा काळ संघर्षाचा आणि आव्हानांचा आहे. अशा वेळी आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागलेले मल्लिकार्जुन खरगे आता त्या पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. ही आव्हाने पेलून पक्षाला नव संजीवनी देण्यात खरगे कितपत यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
अपेक्षेनुसार काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे. 17 ऑक्टोबरला हे मतदान झाले होते. खरगे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. पक्षाच्या 9900 पैकी 9500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी खरगे यांना 7 हजार 897 मते मिळाली, तर थरूर यांना केवळ 1 हजार 72 मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला 137 वर्षांचा इतिहास आहे. या 137 वर्षांत अध्यक्षपदासाठी आता झालेली ही सहावी निवडणूक होती. त्यापैकी दोन निवडणुका स्वातंत्र्यपूर्व काळात झाल्या. स्वातंत्र्यानंतर 1950, 1977, 1997 आणि 2000 मध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला बिगर गांधी परिवाराचा सदस्य अध्यक्ष म्हणून लाभला आहे. खरगे यांच्याआधी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी अध्यक्षपदी राहण्यास असमर्थता दर्शविल्याने सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षा म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होत्या. त्याआधी 1998 ते 2017 अशी तब्बल 22 वर्षे सोनियांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. किंबहुना, 1998 मध्ये जेव्हा एका वेगळय़ा राजकीय परिस्थितीत त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे लागले होते तेव्हा पक्षाची संघटनात्मक आणि राजकीय स्थिती कमकुवत होती. मात्र सोनिया यांनी हे आव्हान स्वीकारले आणि
काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी
दिली. 2004 आणि 2009 मध्ये सलग दोनदा काँग्रेस पक्षाला केंद्रात सत्ता मिळवून दिली. मात्र 2014 मध्ये प्रथमच काँग्रेस पक्षाला मोठा तडाखा देशपातळीवर बसला. नंतरच्या काळात काही राज्यांत काँग्रेसची सरकारे आलीही, पण राष्ट्रीय आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाची स्थिती नाजूकच राहिली. त्यात ‘जी-23’ या गटाच्या नावाने पक्षातील ज्येष्ठांनी उघड आव्हानाची भाषा केली. या गटात शशी थरूरही होते. अगदी आता निवडणूक प्रचारातही त्यांचा सूर तसाच होता. ‘पक्षातील अनेक वरिष्ठ नेते दुसऱया बाजूला आहेत, तर सामान्य कार्यकर्ते आपल्या बाजूला आहेत’ असा दावा थरूर करीत होते. प्रत्यक्षात त्यांना 9500 पैकी जेमतेम 1 हजार 72 मते मिळाली. सोनिया गांधी, राहुल यांचा कल खरगे यांच्याकडेच होता. म्हणूनच ते निवडून आले, असा एक ‘नरेटीव्ह’ पसरविला गेला असला तरी खरगे यांची गांधी कुटुंबाशी जवळीक हा गुन्हा कसा ठरू शकतो? खरगे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वयाची ऐंशी गाठली असली तरी त्यांचा कामाचा आवाका, उत्साह मोठा आहे. राजकीय वर्तुळात त्यांची एक ओळख आहे. त्यांच्या या गुणवैशिष्टय़ांचा काँग्रेस पक्षाला सद्यस्थितीतून उभारी घेण्यासाठी फायदाच होऊ शकतो. पुन्हा काँग्रेसमधील ‘जी-23’ या असंतुष्ट गटाचा रोषही कमी होऊ शकेल. वास्तविक, पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात
गांधी परिवारातील
एकही सदस्य न उतरल्याने या मंडळींचा अर्धा बुरखा फाटलाच होता. आता खरगे यांच्या निवडीने त्यांचा मतलबीपणाही पुरता उघड झाला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने बिगर गांधी कुटुंबाचा सदस्य काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे. काँग्रेस पक्षावर एरवी हुकूमशाहीचा आणि गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मंडळींचे डोळे निदान आता तरी उघडावेत. काँग्रेस हा 137 वर्षे जुना राष्ट्रीय पक्ष आहे. देशभरात आजही त्याची पाळेमुळे रुजलेली आहेत. तो आज कमकुवत असला तरी त्याची ‘शक्तिस्थळे’ शाबूत आहेत. खरगे यांना ती अधिक मजबूत करावी लागतील. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ आणखी पक्की होईल असे पाहावे लागेल. सोनिया गांधी यांच्यासारख्या कणखर पक्षनेतृत्वाचे मार्गदर्शन, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादाने काँग्रेस पक्षाचे देशभरातील कार्यकर्ते, समाजाच्या सर्व स्तरांतील काँग्रेसचे परंपरागत मतदार, हितचिंतक यांच्यात वाढलेला उत्साह, त्यांच्यात निर्माण झालेला विश्वास ही शिदोरी खरगे यांना आव्हाने पेलण्याचे बळ देईल. प्रदीर्घ काळ देशाची राजशकट सांभाळलेल्या काँग्रेस पक्षासाठी सध्याचा काळ संघर्षाचा आणि आव्हानांचा आहे. अशा वेळी आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागलेले मल्लिकार्जुन खरगे आता त्या पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. ही आव्हाने पेलून पक्षाला नवसंजीवनी देण्यात खरगे कितपत यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



























































