
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेला जामिनासाठीची याचिका फेटाळण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या प्रकरणात जामिनासाठी केलेल्या अर्जावरील निकाल सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुपारी सुनावला. विशेष सीबीआय न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला होता. ईडीप्रमाणे सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळून अनिल देशमुख दिवाळीपूर्वी तुरुंगाबाहेर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र जामीन नाकारल्याने अनिल देशमुख यांना आणखी काही काळ तुरुंगातच राहावे लागणार आहे.
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी सीबीआयच्या प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. 73 वर्षीय देशमुख सध्या अतिताण, हृदयविकार यांसारख्या विविध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. तसेच सीबीआयने कथित खंडणी वसुली प्रकरणात केलेले सगळे आरोप तथ्यहीन, निराधार आहेत. तपास यंत्रणेने ज्या सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या जबाबांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे, त्या दोघांचे जबाब विश्वासार्ह नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने ईडीच्या प्रकरणात जामीन देताना नोंदवले आहे, याकडे देशमुख यांच्या वकिलांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे लक्ष वेधले.
गुरुवारी सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह, तर अनिल देशमुख यांच्या वतीने अॅड. विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद पूर्ण केले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी देशमुख यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी दुपारी 3 वाजता निकाल देणार असल्याचे जाहीर केले होते. ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेकडून हजर करण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांना ईडीपाठोपाठ सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मंजूर होऊन ते दिवाळीपूर्वीच तुरुंगातून बाहेर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख सध्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहेत.






























































