उत्तराखंडच्या हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर तणाव, हिंदुस्थानी मजुरांवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या पिथौरागढ येथे हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी संध्याकाळी नेपाळसीमेकडून हिंदुस्थानच्या दिशेने मजुरांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांमध्ये गहजब उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धारचूला परिसरात ही दगडफेक करण्यात आली आहे. येथे काली नदी परिसरात नदीच्या तटांना बांधून काढण्याचं काम सुरू आहे. हे काम आधीच वादात सापडलं आहे. या कामाचा विरोध नेपाळी नागरिक करत आहेत. धारचूला हा नेपाळ आणि चीन सीमेलगतचा भाग आहे. धारचूलापासून 80 किमी अंतरावर चीनची सीमा आहे. तिथेच धारचूला-लिपुलेख मार्ग तयार करण्यात आला आहे.

पण, नेपाळची सीमा धारचूलापासून सुरू होते. येथील काली नदीच्या दोन्ही तटांवर दोन्ही देश वसले आहेत. या दोन्ही ठिकाणांच्या परस्पर वाहतुकीसाठी या नदीवर पूलही बांधण्यात आले आहेत. याच नदीवर सुरू असलेल्या तटांच्या कामावरील मजुरांवर नेपाळच्या दिशेहून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या सीमेलगतच्या भागातील मजुरांमध्ये एकच गोंधळ माजला होता.