त्या कामांची आर्थिक तरतूद उद्धव ठाकरेंच्या सरकारनेच केली, विनायक राऊत यांनी मिंधे सरकारची केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील 750 कोटींच्या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरीत येत आहेत. तिथे ते जाहीर सभा देखील घेणार आहेत. रत्नागिरीतील या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी मिंधे गटाचा आटापिटा सुरू असतानातच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या श्रेयवादाची पोलखोल केली आहे. ”750 कोटींची विकासकामे आम्ही आणली असा ते दावा करतायत. पण त्यातल्या बऱ्याचशा कामांसाठी आर्थिक तरतूद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारनेच केलेली.” असे विनायक राऊत यांनी सांगितले. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे म्हटले आहे.

”जिल्ह्यात 750 कोटींची कामं आम्ही आणले असं ते म्हणतायत पण त्यातल्या बऱ्याचश्या कामांची आर्थिक तरतूद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्येच करण्यात आलेली होती. तारांगणासारखा महत्त्वाकंक्षी प्रकल्प उभा राहिला आहे. तो तत्कालिन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या पुढाकाराने झालेला. त्यामुळे या कामाचं श्रेय त्यांना घेता येणार नाही.” असे विनायक राऊत यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेनेच्या नेत्यांची नावं असल्याबाबत पत्रकाराने विचारले. त्यावरून हा तर प्रोटोकॉल असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले आहे. ”आमंत्रित केलं म्हणजे मेहेरबानी नाही केली. आमची नावं टाकणं हे प्रोटोकॉल आहे. नेत्यांची नावं टाकणं निमंत्रण पत्रिकेत टाकणं ही प्रथा आहे. आम्हाला विचारून काही केलेले नाही. लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना कोणतेही कार्यक्रम घ्यायचे नसतात तरी देखील यांनी रत्नागिरीत आज प्रकल्पांचे भूमीपूजन ठेवले आहे. प्रथापरंपरा मोडीत काढून स्वत:चा टेंभा मिरवण्यासाठी केलेला हा उपद्व्याप आहे, विनायक राऊत यांनी मिंधे गटाला फटकारले.

लांजात मिंधे गटाकडून शिवसेना फोडण्याचे प्रयत्न

”लांजा नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिथल्या नगरसेवकांना आमिषं दाखवली जातायत. पाच पाच कोटींची मदत देण्याचे आश्वासन देऊन त्यांना फोडण्याचे निच काम रत्नागिरीत मिंधे गटाकडून केले जात आहेत” असा आरोप विनायक राऊत यांनी केला.