
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यातून झालेल्या महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट ‘मिंधे’ सरकारच्या दबावाखाली पालिका प्रशासनाने घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईचा एकदिवसीय दौरा करणार असल्याचे समजते. यामुळे पालिका प्रशासनाची नियोजनासाठी प्रचंड धावपळ उडाल्याचे चित्र आहे.
मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गेल्या 25 वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करीत आहे. त्यामुळेच पालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे. गेल्या पाच वर्षांतही सत्तेत असताना मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ-सुंदर, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी शिवसेनेने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प, योजना मार्गी लावल्या. मात्र आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची दिशाभूल करण्यासाठी आणि श्रेय लाटण्यासाठीच पालिकेच्या महत्त्वाचे प्रकल्पांचे भूमिपूजन-लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट ‘खोके’ सरकारच्या दबावातून घातल्याचा संताप मुंबईकरांमधून व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या एकदिवसीय दौऱयात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होत असलेली पालिकेची तीन मोठी रुग्णालये, मलनिस्सारण प्लांट, सिमेंट काँक्रिटचे रस्ते अशा कामांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. शिवाय फेरीवाल्यांसाठी सुरू केलेल्या दहा हजारांची कर्ज योजना ‘पंतप्रधान स्वनिधी योजने’चे उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार असल्याचे कळते.
या कामांच्या भूमिपूजनाचे नियोजन
- पंतप्रधान एकदिवसीय दौऱयात पालिकेच्या हजारो कोटींच्या प्रकल्पांना भेटी देणार असल्याचेही समजते. यात आपली चिकित्सा योजनेअंतर्गत होणारे भांडुप सुपर स्पेशालिटी रुग्णालय, ओशिवरा प्रसूतिगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय आदी कामांचा समावेश आहे.
- तसेच 26 हजार कोटींचे 7 मलनिस्सारण प्लांट, मुंबईत होणारे 400 किलोमीटरचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते, 1 हजार 750 कोटी रुपये खर्चून होणारे मुंबईचे सौंदर्यीकरण अशा विविध शेकडो कामांच्या भूमिपूजनाचे नियोजनही असल्याचे समजते.

























































