मध्य रेल्वे नव्हे भारत पेट्रोलियम सुस्साट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष 26-25 असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतिचषकावर नाव कोरले आणि या मोसमात व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचा चौकार ठोकला.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत दिलीप परब क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना कबड्डीतला खरा थरार अनुभवायला मिळाला. इंडियन ऑइल, सारस्वत बँक आणि एलआयसीच्या पाठिंब्यामुळे दिमाखदार झालेल्या या कबड्डी सोहळय़ाचा समारोप दिलखेचक झाला. आयएसपीएलचा अस्लम इनामदार लक्षवेधी खेळाडू ठरला. मध्य रेल्वेचा आशिष कुमार अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. बीपीसीएलच्या गिरीश इरनावने स्पर्धेतील सर्वोत्तम पकडबहाद्दराचे तर रिशांक देवाडिगाने सर्वोत्तम चढाईपटूचे वैयक्तिक पुरस्कार जिंकले. मध्य रेल्वेचा पंकज मोहिते स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

अत्यंत सावध सुरुवात करणाऱया दोन्ही दिग्गजांनी पहिल्या 20 मिनिटांत कोणताही धोका न पत्करता खेळ केल्यामुळे गुणफलक एकाच वेगाने पुढे सरकत होता. तरी आकाश पिकलमुंडेच्या खोलवर चढाईने पेट्रोलियमला 14-11 अशी 3 गुणांची आघाडी मिळवून दिली होती. ती आघाडी दुसऱया सत्रात शेनटची चार मिनिटे असताना 23-18 अशी होती. मध्य रेल्केचे डबे घसरणार अशी स्थिती होती, पण मैदानात उभे असलेल्या संदीप धुल आणि शुभम शिंदेने पकडीचा भन्नाट खेळ केला. दोघांना टिपण्यासाठी सरसानलेल्या आकाश पिकलमुंडेला संदीप धुल आणि शुभम शिंदेने मगरमिठी मारली की त्यातून आकाश सुटूच शकला नाही. मग 24 व्या मिनिटाला पुन्हा हेच दृश्य दिसले. तेव्हा गुणफलक 25-21 होता आणि जे पिकलमुंडेला जमले नाही ते करण्यासाठी रिशांक देवाडिगा आला, पण संदीप धुलने शुभमच्या साथीने रिशांकचीही पकड करून सामन्याला कलाटणी देण्याचा आणखी एक प्रयत्न केला. स्कोर 25 -23 होता. शेवटचे मिनिट होते, पिकलमुंडेची आणखी एक चढाई केली आणि त्यात त्याने एक गुण मिळविला. स्कोर 26-23 असा असताना पिकलमुंडे पुढे सरसाकला आणि एकाच क्षणात शुभम शिंदेने त्याला निदानरेषेवर अक्षरशः खेचले. शुभमला दोन गुण मिळाले आणि तो चढाई करणार तोच पंचांनी समयसमाप्तीची घोषणा केली. स्पर्धेचा पुरस्कार कितरण सोहळा खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, शाखाप्रमुख संजय भगत आणि स्पर्धेचे आयोजक आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या हस्ते पार पडला.