
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी अकोला ते नागपूरदरम्यान पाणी संघर्ष पदयात्रा काढली आहे. मात्र नागपूरपासून 30 किमीवरील धामणा येथेच आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या दडपशाहीला सामोरे जावे लागले.
पोलिसांनी संघर्ष यात्रा रोखत 500 हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आमदार नितीन देशमुख यांना अक्षरशः फरफटत नेले. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आमदार देशमुख यांना घेऊन पोलीस अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.
अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भाग हा खारपान पट्टा आहे. नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारे पाणी प्यावे लागत आहे. खाऱया पाण्यामुळे या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोगराई पसरली आहे. नागरिकांना किडनी व पोटदुखीचा त्रास होत आहे या पार्श्वभूमीवर आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 10 एप्रिल रोजी अकोला येथून पाणी संघर्ष पदयात्रेला प्रारंभ झाला होता. पुढे अमरावती ते नागपूर असा प्रवास करत 69 गावांतील खाऱया पाण्याचे नमूने एका टँकरमध्ये भरले गेले. हे पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्यायला देणार जेणेकरून त्यांना गावकऱयांची व्यथा कळेल, अशी भूमिका नितीन देशमुख यांनी घेतली होती.
परंतु, हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर पोहोचताच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना धामणा येथे ताब्यात घेतले.
पुढील जलयात्रा पंतप्रधानांच्या निवासस्थानी नेऊ
अकोला आणि अमरावतीमधील जनतेला खारे पाणी प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोक आजारी पडतायत. तेच दोन हजार टीडीएस असलेले पाणी खारपाण पट्टय़ातील माय स्वतःच्या लेकराले पाजते त्यावेळची तिची भावना समजून घेतली पाहिजे. ही भावना समजून घेत आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पिण्यासाठी खारपाण पट्टय़ातील पाणी घेऊन गेलो हातो. ते पाणी देऊन 69 खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता रद्द करणारा आदेश मागे घेण्याची विनंती करणार होतो, मात्र त्यापूर्वीच आम्हाला अडविण्यात आले. आताही पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली नाही तर हेच खाऱया पाण्याचे टँकर घेऊन जलयात्रा पंतप्रधानांच्या निवासस्थानी नेऊ, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.
पालकमंत्र्यांची जिल्ह्याकडे पाठ
अकोला जिल्ह्यात पारस येथे दुर्दैवी घटना घडून सात नागरिक ठार झाले. धामणदरी येथे चार विद्यार्थिनींवर अत्याचार झाला. एका अंध महिलेवर अत्याचार झाला. या घटना घडल्या असतानाही राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अकोला जिह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्याकडे फिरकलेही नाहीत. त्यांना पीडितांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करावेसे वाटले नाही. जिह्यात कायद्याचे राज्य राहिले नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या प्रश्नावर महामोर्चा काढणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.
मी मरेन, पण…
पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दबाव आहे, मात्र काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. मी मरेन, पण जामीन घेणार नाही. सामान्य जनतेसाठी माझा संघर्ष सुरूच राहील, असे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
रस्त्यावर टरबूज फोडून निषेध
आमदार नितीन देशमुखांसह संघर्ष यात्रेतील आंदोलनकर्त्यांना घेऊन नागपूर पोलीस अकोल्यात दाखल झाले असता नेहरू पार्कजवळ शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा आणि निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवणीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ रस्त्यावरच टरबूज फोडले.
महाराष्ट्रात मोगलाई अवतरली
पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱया आमदार नितीन देशमुखांना अटक झाली. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली सरकार जनतेलाच घाबरू लागले, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

























































