
प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. अशीच एक अजब प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरीकेतील मिसिसीपी येथील 24 वर्षाच्या तरूणीची 85 वर्षांच्या आजोबांशी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री वाढली, मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी लग्न करुन संसार थाटला. दोघांच्या वयात 61 वर्षांचा फरक असून त्यांची प्रेमकहाणी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.
डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मिरेकल पोग आणि चार्ल्स पोग असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. मिरेकल पोग हिची 2019 साली चार्ल्स पोग यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि एकमेकांना चांगले ओळखल्यानंतर 2020 साली चार्ल्स यांनी मिरेकला प्रपोज केले. मिरेकललाही चार्ल्स आवडत असल्याने तिनेही लगेच होकार दिला आणि दोघांनी लग्न केले. दोघांचा संसार सुखाचा सुरू असून आता ते मुलांचा विचार करत आहेत. आपली अनोखी प्रेमकहाणी सांगत मिरेकलने सांगितले की, पहिल्या भेटीत तिला चार्ल्स यांचे वय किती आहे हे माहित नव्हते. मात्र तिला त्यांच्यासोबत कायम सुरक्षित वाटायचे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि ते एकमेकांचा आदरही करत होते. एकदिवस चार्ल्स यांनी मिरेकलला तिचे जन्मवर्ष विचारल्यानंतर त्यांना एकमेकांचे वय कळले. मात्र वय त्यांच्या प्रेमाच्या आड कधीच आले नाही.
मिरेकलने सांगितले की, ”मी त्यांच्या वयाबाबत विचार केला नाही. ते 100 वर्षांचे असो किंवा 55 वर्षांचे मला त्याचा काही फरक पडत नाही. मला वाटायचे ते 60 किंवा 70 वर्षांचे असतील. कारण त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही कारण ते फार अॅक्टिव्ह आहेत”. पुढे ती म्हणाली की, ”माझ्या आजोबांनी सांगितले की, जर तू आनंदी आहेस तर हरकत नाही. मात्र तिच्या या निर्णयाने तिचे वडिल मात्र निराश झाले होते. त्यांची परवानगी मिळायला फार वेळ लागला. मी त्यांना सांगितले होते की, ते माझ्या लग्नाला आले नाहीत तर ते मला कायमचे गमावतील. पण जसे त्यांनी चार्ल्स यांना भेटून त्यांच्याशी बोलले तसे त्यांनी लगेच होकार दिला. आता हे जोडपं आयवीएफच्या मदतीने आई-वडिल बनण्याचा प्रयत्न करत आहेत.
























































