
नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणाला असला तरी वर्ल्ड कपच्या नावात खूप काही आहे. क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होऊन 48 वर्षे झाली तरी या वर्ल्ड कपच्या नावात बदल होतातच आहेत. गेल्या वर्ल्ड कपमध्ये ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्ड’ असलेली ही क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा आता ‘आयसीसी मेन्स वर्ल्ड कप’ अशी नामांतरित झाली आहे. गेल्या 48 वर्षांत या स्पर्धेचे नाव बदलण्याची परंपरा सुरूच आहे. ती किमान कुठेतरी थांबावी अशी अपेक्षा आहे.
1975 साली क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हा त्याचे नाव होते प्रुडय़ेन्शियल कप 75. प्रुडय़ेन्शियल ऍश्युरन्स कंपनी या वर्ल्ड कपची प्रायोजक असल्यामुळे त्यांच्याच नावाने ही स्पर्धा खेळविण्यात आली. मग 1979 आणि 1983 सालीसुद्धा याच नावाने वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. या तिन्ही स्पर्धांचे यजमानपद इंग्लंडनेच भूषवले होते. मात्र 1987 साली प्रथमच वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडच्या बाहेर गेले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने ही स्पर्धा संयुक्तपणे आयोजित केली आणि या स्पर्धेला रिलायन्स कंपनीचे प्रायोजकत्व लाभल्यामुळे ‘रिलायन्स कप 87’ असे नाव देण्यात आले होते. मग 1992 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने यजमानपदाची जबाबदारी स्वीकारली आणि प्रथमच स्पर्धेच्या नावात ‘वर्ल्ड कप’ नाव देण्यात आले. ही स्पर्धा ‘बेन्सन ऍण्ड हेजेस वर्ल्ड कप 1992’ या नावाखाली खेळविली गेली. 1996 साली पुन्हा हिंदुस्थानात वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ‘विल्स वर्ल्ड कप’ नावाने पार पडली.
सहा स्पर्धा वेगवेगळय़ा नावांनी आयोजित केल्यानंतर 1999 साली इंग्लंडमध्ये पुन्हा स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि प्रथमच स्पर्धेचे नाव आयसीसी वर्ल्ड कप असे कायमस्वरूपी निश्चित करण्यात आले. हे नाव ‘फिफा वर्ल्ड कप’च्या धर्तीवर करण्यात आले होते. यानंतर सलग सहा स्पर्धांना हेच नाव वापरण्यात आले होते, मात्र आता या स्पर्धेच्या नावात प्रथमच मेन्स वापरण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत महिलांच्या क्रिकेट सामन्यांमध्येही वाढ झाल्यामुळे आयसीसीने ‘आयसीसी वर्ल्ड कप’च्या नावात बदल केल्याचे कळले आहे.



























































