स्वरूपा : माणुसकी – पहिली माळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. युगंधरा रणदिवे

स्त्री ही जन्मतः भावुक, हळवी असते. लोक ही तिची कमजोरी समजतात. ती सहजतेने दुसऱयाच्या दुःखात सामील होते. अगदी सिनेमा बघताना, पण दहा वेळा डोळे पुसेल. पण दुसरा रडला की, आपणही डोळय़ाला पदर लावला म्हणजे झालं? माणुसकी ही दाखवावी लागते हेच थोडे खटकते. ज्याला जेव्हा जशी लागेल तशी मदत करणं, कुठलाही हेतू मनात न ठेवता, हीच तर माणुसकी! पण अनेकदा घरचे (म्हणजे ‘अहो’ वा सासूबाई) काय म्हणतील? जाऊ दे कशाला कुठल्या भानगडीत पडा, आधीच काय कमी व्याप आहेत? इत्यादी विचार मदतीच्या सुविचाराला मागे खेचतात. आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत, विचार करू शकतो, आचरण करू शकतो यावरच बायका विश्वास ठेवत नाहीत.

मदत आर्थिक, शारीरिक काम, शिकवणे, कोणा आजारी माणसाला थोडावेळ बघणे, कोणाला जेवणाचा डबा देणे, अशी वा अजून कुठल्यातरी प्रकारची असेल, जमेल तर अवश्य करावी.

बायका बायकांच्या शत्रू असतात अनेक वेळा. मुलगी-सून, आई-सासू, वडील-सासरे, बहीण-नणंद वा जाऊ नात्यामध्ये आपणच फरक करतो. सासू सुनेला मुलीसारखी वागवूच शकत नाही. सून सासूचे दुखणे आई समजून काढत नाही. माणसांना माणसांसारखं वागवता यायला हवं ना?

खूप महान, दानशूर, त्यागी, सर्वांना माफ करणारी अतिआदर्श साध्वी बनू नका. ‘खटनटाशी खटनट’ हे ठीकच, पण माणुसकी सोडू नका. तुमच्या आतल्या आवाजाचेच नेहमी ऐका. नुसत्या डोळय़ांतून धारा वाहवण्यापेक्षा मनातून माणुसकीचा झरा वाहू दय़ा.