
पाकिस्तानचे प्रसिद्ध मौलाना तारिक जमील यांचा मुलगा आसिम जमील याने आत्महत्या केली आहे. मौलाना यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे की, ”माझा मुलगा आसिम जमील याचे आज तुळंबा येथे निधन झाले. या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तो तुळंबा येथील त्यांच्या फार्महाऊसवर होता. त्याच्या छातीत गोळी लागली”. त्याने आत्महत्या केल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. मात्र याबाबत पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूच्या कारणाबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
मियां चन्नूचे डीएसपी मोहम्मद सलीम यांनी डॉनला सांगितले की, असीम जमीलला तुलांबा मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित केले. मृतदेह आरोग्य केंद्रातून कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित केले जाईल. पाकिस्तान ट्रिब्यूनने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, प्रसिद्ध इस्लामिक मौलाना तारिक जमील यांचा मुलगा असीम जमील याचा त्याच्या फार्महाऊसवर छातीत गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. तुळंबा रुग्णालयाचे डॉक्टर आसिफ इमाम यांनी मृत्यूला दुजोरा दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असीम फार्महाऊसमधील त्याच्या जिममध्ये व्यायाम करत होता, तर एक गार्ड त्याच्या सुरक्षेसाठी तैनात होता. असीमने त्याच्याजवळील बंदुक हिसकावली आणि स्वतःच्या छातीत गोळी झाडली.
जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, मुलतान क्षेत्रीय पोलीस अधिकारी कॅप्टन (निवृत्त) मुहम्मद सोहेल चौधरी यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजनुसार मौलाना तारिक जमील यांच्या मुलाने आत्महत्या केली. त्याने गार्डकडून बंदूक हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडली. आरपीओ सोहेल यांनी सांगितले की, असीम मानसिक आजाराने त्रस्त होता. त्यावर त्याचे औषधोपचार सुरु होते. आरपीओ चौधरी यांनी सांगितले की, त्याने 30 बोअरच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती देताना पोलीसांनी सांगितले की, असीमने बंदूक छातीकडे वळवली तेव्हा गार्डने त्याला तसे करण्यापासून रोखले पण त्याने ऐकले नाही आणि स्वत:चा जीव घेतला.


























































