वाढत्या गुन्हेगारीमुळे जेल ओव्हरफ्लो, एकूण कैद्यांची संख्या 40 हजारांहून अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्थेवरील वाढत्या बोज्यामुळे राज्यातली कारागृहे सध्या ओव्हरफ्लो होऊ लागली आहेत. राज्यातील कारागृहांत सध्या असलेल्या सुमारे 40 हजार कैद्यांपैकी फक्त आठ हजार जण विविध गुह्यांत शिक्षा भोगत आहेत. उर्वरित 32 हजारांहून अधिक कच्च्या कैद्यांमुळे जेल प्रशासनावर प्रचंड ताण पडला आहे. त्यामुळे पालघर व नगरमध्ये दीड हजार कैद्यांची क्षमता असलेली दोन नवीन कारागृहे बांधण्यात येत आहेत.

राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारीत 59 कारागृहे आहेत. या कारागृहांमधील कैद्यांची क्षमता 25 हजार 393 इतकी आहे. जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार या कारागृहांत प्रत्यक्षात 40 हजार 485 कैदी आहेत. यातील आठ हजार कैद्यांना प्रत्यक्ष शिक्षा झालेली आहे. उर्वरित सुमारे 32 हजार 485 कच्चे कैदी आहेत.

गुन्हेगारांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या कारागृहांत कैद्यांची दाटी झाल्याने गृह विभागाची डोकेदुखी वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे जागेवरून कैद्यांमध्ये अनेकदा मारामारी होते. कोरोना काळात किरकोळ गुन्हे असलेल्या कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडले होते, पण आता पुन्हा जेलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे नव्या कारागृहांची गरज भासू लागल्याने पालघरमध्ये दीड हजार क्षमतेचे व नगरमध्ये पाचशे कैद्यांच्या क्षमतेचे नवीन कारागृह बांधण्यात येत आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. या नवीन कारागृहांमध्ये कैद्यांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा गृह विभागाचा प्रयत्न आहे. या जेलमध्ये चांगले वाचनालय, योगा हॉल बांधण्यात येणार आहे.

लांबच्या जेलमध्ये जाण्यास नाखूश
मुंबई, नाशिक, तळोजा अशा जेलमध्ये गर्दी झाल्याने तुलनेत कमी गर्दी असलेल्या लातूर, रत्नागिरीसारख्या कारागृहांत कैद्यांना पाठवण्यात येते, पण लांबच्या जेलमध्ये जाण्यास कैदी नाखूश असतात. कारण लांबच्या जेलमध्ये येऊन भेटण्यास नातेवाईकांना अडचणी निर्माण होतात असे सांगण्यात येते.

गृह विभागाच्या अखत्यारीतील जेलची संख्या – 59
या कारागृहांतील कैद्यांची क्षमता – 25 हजार 393
प्रत्यक्ष कैद्यांची संख्या सुमारे 40 हजार 485
पालघरमधील नवीन कारागृहाची क्षमता – दीड हजार कैदी
नगरमधील नव्या कारागृहाची क्षमता – 500 कैदी