
उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांच्यावर हल्ला झाला आहे. रविवारी रात्री 12च्या सुमारास संतकबीर नगर भागामध्ये 20 ते 25 अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या नाकाला दुखापत झाली असून रक्तस्रावही झाला. यामुळे खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय निषाद हे रविवारी मोहम्मदपूर कटार गावामध्ये एका लग्नसमारंभासाठी गेले होते. या समारंभाहून परत येताना संतकबीर नगर भागामध्ये 20 ते 25 जणांच्या जमावाने त्यांच्यावर त्यांच्या समर्थकांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे संजय निषाद यांच्या नाकाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या नाकाला मलमपट्टी करण्यात आली.
संतकबीर नगर भागात हल्ला झाल्याची माहिती संजय निषाद यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. या हल्ल्याची माहिती मिळताच संजय निषाद यांचा मुलगा आणि संतकबीर नगर मतदारसंघाचा खासदार प्रविण निषाद आणि जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी रुग्णालयात धाव घेतली.
संजय निषाद यांच्यावर समाजवादी पार्टीच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी स्वत: संजय निषाद, त्यांचा मुलगा आणि इतर आमदारही रुग्णालयात काही वेळासाठी उपोषणाला बसले होते.
दरम्यान, संजय निषाद यांच्यावर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. या हल्ल्यामागे त्यांना नक्की काय उद्देश होता याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच पोलीस अधीक्षक सत्यजीत गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक शशी शेखर सिंह यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन कारवाईचे हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन दिले.




























































