
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पी.डि’मेलो मार्गाला जोडणाऱया 154 वर्षे जुन्या कर्नाक पुलाची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू असून मंगळवारी रात्री या पुलाचा 550 मेट्रिक टन वजनाचा उत्तर बाजूचा गर्डर 9.30 मीटरपर्यंत सरकवण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून ’ब्लॉक’ जाहीर झाल्यावर पाच तासांच्या कालावधीत तुळई आणखी पुढे सरकवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून रेल्वेशी चर्चा सुरू असून हा पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते.
असे झाले काम
कर्नाक पुलाच्या उत्तर बाजूच्या लोखंडीचे सुमारे 550 मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्पस्थळावर दाखल झाल्यावर जोडकाम प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यानंतर 14 जानेवारी 2025 रोजी ‘ट्रायल रन’ करण्यात आले आहे. गर्डर सरकविण्याचे हे काम तांत्रिकदृष्टय़ा अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी विशेष तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. रेल्वे हद्दीत गर्डर बसवण्यासाठी ‘ब्लॉक’ मिळण्याबाबत पालिका मध्य रेल्वेकडे पाठपुरावा करीत आहे.