
गुढीपाडव्याला उद्या भव्य शोभायात्रांनी मुंबई दुमदुमणार आहे. पारंपरिक पेहरावातील साजशृंगार, सडा रांगोळी, सनई-चौघडे आणि उंच गुढ्या असा जल्लोष मुंबईसह राज्यभर दिसेल. यानिमित्ताने मराठी संस्कृतीचे विराट दर्शन घडणार आहे.
मुंबईच्या विविध भागांत भव्य शोभायात्रा निघतील. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ दिसून येईल. गिरगावचा पाडवा आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. ‘वंदे मातरम्’ची 150 वर्षपूर्ती या विशेष संकल्पनेवर आधारित 20 फूट उंचीचे देखावे, विविध चित्ररथ, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असा भव्य सोहळा होईल. ताडदेव, लालबाग- परळ, वरळी, दादर, बोरिवली, विलेपार्ले, दहिसरमध्ये शोभायात्रांचा जल्लोष दिसून येईल.
ताडदेवमध्ये वैभव यात्रा
ताडदेवमध्ये वैभव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता नाना चौक येथून यात्रेला सुरुवात होणार असून दुपारी एक वाजता फिल्म सेंटर, ताडदेव येथे सांगता होईल. शिवसेना उपनेते व जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वैभव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत वारकरी दिंडी, महिलांचे लेझीम पथक, हलगी, ढोल-ताशे वाद्य पथके सहभाग घेणार असून कोल्हापूरचा दांडपट्टा व कोकणच्या लोकजीवनातील रोंबाटसारखे विविध पारंपरिक खेळ सादर केले जाणार आहेत.






























































