
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महान नेत्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे यांसारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू शकतो, अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केल्या.
राज ठाकरे यांनी थोर अर्थशास्त्रज्ञ, राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत सोशल मीडियावर पोस्ट केली. महान लोकांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीपातीत विभागणे, त्यांच्या नावाने जाती-धर्मात फूट पाडणे योग्य नाही. यातून बाहेर पडायला हवे. नाहीतर या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरत्याच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आताच्या सत्तापिपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू, असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.
‘बाबासाहेबांचे देशासाठी योगदान अतुलनीयच आहे आणि येणाऱ्या पिढय़ा त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे हिंदुस्थानी रुपयाचे अवमूल्यन कसे झाले आणि त्याचा सामान्यांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केले. स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवे इतकीच आस नव्हती, तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झाले पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकासदेखील झाला पाहिजे.’ असे ते म्हणाले.





























































