
शालेय बसचे भाडे तसेच बसमध्ये विविध सुरक्षा प्रणाली बसवण्यासंबंधित राज्य सरकारच्या धोरणाला स्कूल बसमालकांनी तीव्र विरोध केला आहे. सरकार नवनवीन धोरण राबवून विद्यार्थी सुरक्षिततेच्या नावाखाली स्कूल बसमालकांना त्रास देत आहे, असा आरोप स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केला आहे. पुढील आंदोलनात्मक रणनिती ठरवण्यासाठी असोसिएशनने शनिवारी स्कूल बसमालकांची बैठक बोलावली आहे.
बसचा वाढता देखभाल खर्च, पार्पिंगचा प्रश्न तसेच इतर बेकायदा वाहतूक याकडे सरकार लक्ष देत नाही, मात्र नवनवीन धोरण राबवून स्कूल बसमालकांना नाहक त्रास देत आहे. केवळ बस उत्पादकांच्या फायद्यासाठी सरकार बसमध्ये नवनव्या प्रणाली बसवण्याची सक्ती करीत आहे, असा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला.




























































