
स्वर्गीय वसंतदादा आणि राजाराम बापूंचा नेमका काय वाद आहे तो समजून न घेता, आम्ही गैरसमजातून भांडत राहिलो. त्याचा फायदा घेत जिह्यात भाजपचा जातीयवादी विचार शिरला. भविष्यात या विचाराविरुद्ध एकजुटीने, ताकदीने लढू, असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कासेगाव येथे केला. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत यापुढे जिह्यात ही आघाडी दीर्घकाळ काम करत राहील, अशा विश्वास व्यक्त केला.
कासेगाव (ता. वाळवा) येथे नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या नेत्यांनी जुने वाद, इतिहास यावर खुमासदार चर्चा करताना भविष्यातील एकीच्या योजना मांडल्या. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, मनोज शिंदे म्हैसाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, बाळासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, सुष्मिता जाधव यावेळी उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत राजकारणाची पातळी खालावली आहे. भाषा खालच्या पातळीवर गेली आहे. व्यक्ती सापेक्ष भाषा आणि सांप्रदायिक भाषणामुळे लोकांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न पुरोगामी असणाऱया सांगली जिह्यात सुरू आहे. आपण एकसंग लढत असल्याने जिह्यातील जनतेने आपल्या पार्टीची ताकद उभी केली. यापुढेही आपण एकजुटीने असेच जिह्याच्या विकासासाठी लढत राहू.
आमदार, डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सध्याचा काळ संघर्षाचा आहे. जिह्याच्या हितासाठी आणि चुकीचा विचार रोखण्यासाठी एकत्र येऊन लढावे लागेल. वाहन चालवताना वाहनामधल्या आरशात सारखे बघायचं नसते, अन्यथा अपघात होतो. तसे इतिहासाकडे सारखे बघून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
खासदार विशाल पाटील यांनी तुफान टोलेबाजी केली. ते म्हणाले, कासेगावच्या चौकात आमच्या लय सभा झाल्या. मात्र, एवढय़ा गर्दीची सवय नव्हती. आमच्या तिघांच्या घरांनी खूप संघर्ष पहिला. त्यात थोडे सगळेच मागे पडत गेलो. त्याचा फायदा घेऊन एक वेगळा विचार या जिह्यात शिरला. भाजपचा जातीयवादी विचार इथे वाढला. आमच्यात काहीही वाद असो, भाजपला पळवून लावायला आम्ही एकत्र असू. राजकारणात वसंतदादा, राजाराम बापूंचे मतभेद झाले. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांवर प्रेम केले. आम्ही गैरसमजातून राजकीय वादात रूपांतरित केले. विश्वजीत यांच्याबाबत माझे नाहक वाद झाले. कदम साहेबांच्या निधनानंतर विश्वजीत माझा बदला घेतील, असे वाटले होते; पण त्यांनी मला सोबत घेतले, प्रेम दिले. त्यानंतर आम्ही जयंत पाटील यांच्याकडे आलो. वाद बाजूला ठेवून पुढे जाण्याचे ठरवले. ईश्वरपूर, आष्टा पालिकेत काँग्रेसने उमेदवार दिले नाहीत. त्याचा थोडा फायदा तुम्हाला झाला.
जिल्हा परिषदेचे सभापती पृथ्वीराज पाटील, सावित्री रवी पाटील, स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंग पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, कवठेमहांकाळच्या सभापती सिंधूताई पाटील, उपसभापती वामन कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार झाला. देवराज पाटील यांनी स्वागत केले. विजयराव यादव, संग्राम फडतरे, बाळासाहेब पवार, संग्राम जाधव यावेळी उपस्थित होते. कल्पना गावडे यांनी आभार मानले.



























































