श्रीनिवास पाटील यांना सातारा भूषण पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठsचा ‘सातारा भूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व माजी राज्यपाल श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख 40 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती ट्रस्टचे ट्रस्टी डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली.

ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सातारा जिह्याचा नावलौकिक वाढविणाऱया व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. गेली 35 वर्षे ही परंपरा सातत्याने जोपासली जात आहे.

कराड तालुक्यात जन्मलेल्या श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिह्याच्या जडणघडणीत विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यासोबतच सहकार क्षेत्रातील पुढाकारामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला नवी दिशा मिळाली. साताऱयाची अस्मिता, गड-किल्ल्यांचा वारसा आणि इतिहास जपण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ‘प्रतिसरकार’ चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव आणि त्यांच्या कार्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्यांनी प्रभावीपणे केले. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रशासनात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. त्यापैकी ‘लोकदरबार’ ही संकल्पना विशेष गाजली.