अशोक खरातचा एन्काऊंटर होण्याची शक्यता, प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, यामध्ये सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि मंत्र्यांचीही नावे समोर येऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी उघड होण्याआधीच त्याचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा आरोप करत कॉँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.

खरात प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावे समोर येण्याची शक्यता असून, ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सोलापूर जिह्यातील जमिनींच्या प्रकरणात सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि खरात यांच्यात थेट संगनमत असण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे पुरावे लवकरच बाहेर येऊ शकतात, मात्र त्याआधीच परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती प्रणिती शिंदे सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.

निनावी पत्राची चौकशी करा – रुपाली चाकणकर

भोंदू अशोक खरात प्रकरणात आरोप झालेल्या रूपाली चाकणकर यांनी अखेर 28 दिवसांनंतर आपले मौन सोडले. चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महिला पदाधिकारी अशोक खरातकडे महिलांना घेऊन जात होत्या, असा आरोप करणारे एक पत्र या प्रकरणाचा तपास करणाऱया विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आले होते. या पत्राची चौकशी करा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.