
भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलाशांची मालिका सुरूच असून, संपूर्ण प्रकार हा केवळ फसवणूक नसून संघटित आर्थिक घोटाळा असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अहिल्यानगर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत समता नागरी पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेल्या 57 बोगस खात्यांचा भांडाफोड केला असून, त्यापैकी 35 खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. उर्वरित खातेदारांना आज व उद्या नोटिसा बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देवदर्शन आणि धार्मिक विधींच्या नावाखाली सर्वसामान्य भक्तांची सर्रास फसवणूक करण्यात आली. श्रद्धेचा गैरफायदा घेत आधार कार्ड व पॅन कार्ड गोळा करून त्यांचा गैरवापर करण्यात आला. यानंतर पॅन कार्डवरील मूळ सह्यांशी साधर्म्य साधत बनावट सह्या करण्यात आल्या आणि त्या आधारे विविध बँक खाती उघडण्यात आली.
पोलिसांनी तपासलेल्या 35 खात्यांमध्ये तब्बल 90 टक्के सह्या संशयास्पद आढळल्या आहेत. यावरून हा प्रकार नियोजनबद्ध आणि तांत्रिक कौशल्य वापरून आणि संघटित टोळीमार्फत राबविण्यात आल्याचा संशय अधिक बळावत आहे. या खात्यांमधून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येत असून, व्यवहारांची रक्कम कोटय़वधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
इतक्या मोठय़ा प्रमाणावर बोगस खाती उघडली गेल्याने पतसंस्थेतील काही अधिकाऱयांची भूमिकाही संशयाच्या भोवऱयात आली आहे. आवश्यक कागदपत्रांची कसून पडताळणी न करता खाती उघडण्यात आली का, तसेच या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींचा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सोमवारी (दि. 13) रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी करून तिचा जबाब नोंदवण्यात आला. दुसरीकडे, मुख्य आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात अद्याप फरारी असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. ती सापडल्यानंतर या घोटाळ्यातील अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचे जाळे अहिल्यानगरपुरते मर्यादित नसून शिर्डी, कोपरगाव, शेवगाव, नाशिकसह विविध भागांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या खातेदारांना नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलावले जात आहे. पोलिसांकडून बनावट सह्यांची फॉरेन्सिक तपासणी, बँक व्यवहारांचा डिजिटल मागोवा, मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास अशा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.



























































