
बँकेकडून कर्ज मंजुर होण्यास उशीर झाल्यामुळे 2024 च्या लॉटरीत विरार बोळींज येथील घरासाठी विजेते ठरलेल्या रामकृष्ण पाताडे यांना घराची रक्कम भरण्यास उशीर झाला. त्यामुळे म्हाडाच्या कोकण मंडळाने नियमानुसार त्यांना 1 लाख 83 हजार व्याज भरण्यास सांगितले. हे व्याज माफ करण्याची विनंती त्यांनी म्हाडाच्या लोकशाही दिनात केली. या अर्जावर सुनावणी करताना म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून पाताडे यांचे व्याज माफ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात नागरिकांच्या 13 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. यात मुंबई मंडळाशी संबंधित 3, कोकण मंडळाशी संबंधित 2 व मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी संबंधित 8 अर्ज होते. अर्जदार अश्लेषा आंबेकर यांच्या आई सुनीला आंबेकर, गिरणी कामगार सोडतीत अपोलो मिल योजनेतील संकेत क्रमांक एकमध्ये यशस्वी अर्जदार ठरल्या. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर व अपोलो मिलतर्फे प्राप्त पत्राच्या आधारे सुनीला यांना अपात्र ठरविले. या प्रकरणी अर्जदारांनी अपील केले असता, उपायुक्त, कामगार विभागाने त्यांना पात्र ठरविले. दरम्यान, सुनीला आंबेकर यांचे निधन झाले. पात्रता निश्चिती झाल्यामुळे या घराचा ताबा मुलगी या नात्याने वारस म्हणून मिळावा याकरिता लोकशाही दिनात अर्ज केला. या अर्जावर सुनावणी करताना अर्जदाराने सादर केलेल्या वारसाहक्क प्रमाणपत्राच्या आधारे म्हाडा उपाध्यक्षांनी अश्लेषा आंबेकर यांना त्वरित घराचा ताबा देण्याचे निर्देश दिले. गिरगाव येथील पारिजात सदन इमारतीतील एका अर्जदाराने आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नियमितीकरणाची दंडात्मक रक्कम माफ करण्याबाबत अर्ज केला. त्यावर अर्जदाराने केवळ 14,750 मुद्दल भरणे गरजेचे असून त्यावर आकारलेले 65 हजार व्याज संपूर्णतः माफ करण्याचा निर्णय उपाध्यक्षांनी घेतला.


























































