‘कुल्फी’तही भेसळ; ‘अमूल’ची 1856 पॅकेट्स जप्त, ‘अन्न व औषध’चा अहिल्यानगरमध्ये छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत 55 हजार 680 रुपये किमतीची एक हजार 856 पॅकेट्स कुल्फी जप्त केली. जप्त केलेले पॅकेट्स नामांकित ‘अमूल’ बॅण्डच्या विविध प्रकारच्या कुल्फींचे आहेत. यामध्ये वनस्पती तेल व फॅटचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कायद्यानुसार आईक्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तपासणीदरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. संशयित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत (अमूल) उत्पादित आणि पुरवठा होणाऱया कुल्फींमध्ये भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार शहरातील तीन प्रमुख वितरकांना माल पुरवठा करणाऱया वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी आढळलेल्या संशयास्पद कुल्फीचा साठा तत्काळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सहायक आयुक्त ग. वि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बडे, निरीक्षक कि. ध. जगदाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

50 वितरक रडारवर

अहिल्यानगर शहरात ‘अमूल’ बॅण्डचे तीन अधिकृत वितरक असून, संपूर्ण जिह्यात सुमारे 50 वितरक कार्यरत आहेत. या सर्वांवर आता अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले असून, लवकरच व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच त्यांना नोटिसा काढण्यात येणार आहेत. नियमभंग आढळल्यास संबंधित वितरक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बडे यांनी स्पष्ट केले आहे.