पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी होणार महाग? पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर भडका उडणार, दररोज होतेय 1600 कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढला आहे. अमेरिकेने होर्मुझचा मार्ग रोखण्याची धमकी दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली. गेल्या आठवडय़ात 94 डॉलर प्रति बॅरलपर्यंत उतरलेले दर शंभरी पार करून 105 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलची मोठी दरवाढ होण्याची भीती आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा मोठा झटका बसू शकतो. पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपये प्रति लिटरने महाग होण्याची शक्यता आहे.

मॅक्वायरी या ब्रोकरेज फर्मच्या अहवालातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतरही हिंदुस्थानात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सरकारने विशेष उत्पादन शुल्क घटविले आहे. मात्र तरीही तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्याशिवाय पंपन्यांसमोर पर्याय नाही.

चर्चेची आशा पल्लवित, दरांमध्ये थोडा दिलासा

दोन आठवडय़ांचा युद्धविराम जाहीर केल्यानंतर 94 डॉलरपर्यंत हे दर घसरले होते. सोमवारी 104 डॉलरपर्यंत हे दर वाढले. शांतता चर्चा पुन्हा सुरू होण्याची आशा बळावल्यानंतर कच्चे तेल आज थोडे स्वस्त झाले. आज 100 डॉलरपर्यंत कच्च्या तेलाचे दर आले आहेत.

2,400 कोटींचे तेल कंपन्यांचे नुकसान

इराणवर हल्ला होण्यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी कच्च्या तेलाचे दर 73 डॉलर प्रति बॅरल एवढे होते. युद्ध ज्या वेळी टिपेला पोहोचले होते, त्या वेळी हे दर 19 मार्चला 120 डॉलर प्रति बॅरल एवढे होते. मार्च महिन्यात तेल कंपन्यांना दररोज 2,400 कोटींचे नुकसान होत होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर नुकसानीचा आकडा 1,600 कोटींपर्यंत कमी आला. मात्र नुकसान होतच असल्यामुळे तेल कंपन्या इंधन दरवाढीचा निर्णय घेऊ शकतात.