
पहिल्याच षटकांत तीन फॉर्मातील धडाकेबाज फलंदाजांना शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेने आयपीएलच्या मैदानावर इतिहास रचला. नागपूरचा मराठमोळा पोट्ट्या आपल्या पहिल्याच भेटीत आयपीएलचा सर्वाधिक सनसनाटी पदार्पण करणारा स्टार ठरला. आयपीएलमध्ये स्वप्नवत प्रवास करणारा अनोखा प्रफुल एका क्षणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
राजस्थान रॉयल्ससारख्या तगड्या फलंदाजीसमोर पहिलाच चेंडू टाकताना अनेकांची पावले थरथरली असती. पण हिंगेचा आत्मविश्वास वेगळाच ठरला. दुसऱ्याच चेंडूवर पहिली विकेट आणि त्यानंतर सलग धक्के. जणू नागपूरहून आलेला हा वेगवान वादळच राजस्थानच्या तंबूत घुसलं होतं. तीन विकेट्सचा तो झटका इतका जबरदस्त होता, की क्रिकेटप्रेमींची बोटं मोबाईलवर फिरली आणि ‘हा हिंगे कोण?’ असा प्रश्न गुगललाच पडला!
पण या यशामागे केवळ वेग नाही तर संघर्षाची कहाणी आहे. घरातून सुरुवातीला पाठिंबा नव्हता, पण बहिणीच्या जिद्दीने आणि मेहनतीने प्रेरित होऊन प्रफुलने स्वतःचा मार्ग तयार केला. 12व्या वर्षी समर कॅम्पनंतर वडिलांनी दिलेली परवानगी त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.
उमेश यादव हा त्याचा आदर्श. विदर्भ एक्सप्रेसच्या वेगात स्वतःचा वेग मिसळत हिंगेने स्वप्न रंगवलं. विशेष म्हणजे, दोघांनी एकाच ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवला आणि तिथेच या तरुणाच्या मनात मोठं होण्याचं बी पेरलं गेलं. आणि तोच मुलगा आयपीएल लिलावाच्या वेळी मंदिरात बसून देवाकडे प्रार्थना करत होता. मागच्या वर्षी कोणी विचारही केला नव्हता, पण यंदा त्याने वडिलांना दिलेलं वचन पाळलं आणि थेट इतिहास घडवला!
हिंगेची ही कहाणी म्हणजे केवळ पदार्पण नाही, तर स्वप्न, संघर्ष आणि जिद्दीचा ज्वालामुखी आहे. आज नागपूरचा हा पोट्टया केवळ आयपीएलमध्ये नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या क्रिकेटविश्वात खळबळ माजवत आला आहे.



























































