सीएसएमटीहून बंगळुरूसाठी ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला मंजुरी, बंद केलेल्या राज्यांतर्गत गाड्या पूर्ववत करण्याकडे मात्र डोळेझाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासोबत दुजाभाव कायम ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. कोविड काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे रेल्वे मंत्रालयाने डोळेझाक केली असून महाराष्ट्रातून परराज्यांसाठी नवनव्या गाड्या चालवण्याचा धडका सुरू ठेवला आहे. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) बंगळुरूसाठी नवीन ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला मंजुरी दिली. याच वेळी राज्यांतर्गत गाड्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे मंत्रालय आणि प्रवाशी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.

सीएसएमटी-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एक्स’वर जाहीर केले. त्यांच्या पोस्टवर प्रवाशांनी टीकेचा भडीमार केला. कोकण, कोल्हापूर, नागपूर, पुणे आदी विभागांसाठी मुंबईहून पुरेशा प्रमाणात गाड्या सोडण्याचा निर्णय सरकार का घेत नाही, असे सवाल प्रवाशांनी उपस्थित केले.

मुंबई-बंगळुरूदरम्यान जलद गाडीची घोषणा झाली हे उत्तम. परंतु महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांनी विनंती केल्यास रेल्वे मंत्री नक्कीच राज्यातील गाड्या पूर्ववत करण्याचे आदेश देतील. – अक्षय महापदी, रेल्वे वाहतूक अभ्यासक