बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री, सम्राट चौधरी आज घेणार शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते सम्राट चौधरी यांची निवड झाली आहे. त्यांच्या रूपाने बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. चौधरी हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

तब्बल दोन दशके बिहारच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या नितीश कुमार यांनी नुकतीच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. संयुक्त जनता दल व भाजपमध्ये यावरून वेगवेगळे दावे केले जात होते. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सम्राट चौधरी यांच्या नावाची औपचारिक घोषणा झाल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. सम्राट चौधरी हे तारापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जातात. बिहार भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

लालूंचा चेला

सम्राट चौधरी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय जनता दलातून झाली. आरजेडीमधूनच ते पहिल्यांदा आमदार झाले. राबडी देवींच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. कालांतराने त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला. देशात सत्तांतर झाल्यानंतर 2017 साली त्यांनी भाजपला जवळ केले. त्यांच्या नावाची घोषणा होताच ‘लालूंचा चेला’ मुख्यमंत्री झाल्याची प्रतिक्रिया उमटली. सम्राट चौधरी हे लालूजींच्या शाळेचेच विद्यार्थी असल्याचे आरजेडीचे नेते तेजस्वी यादव म्हणाले.