अमरावतीत सेक्स स्कॅण्डल, 180 तरुणींचे लैंगिक शोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिह्यामधील परतवाडा येथे एका 19 वर्षीय तरुणाने 180 तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याला अटक केली आहे.

तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मुलींचे व्हिडीओ दाखवून वेश्या व्यवसायासाठी धमकावले जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. हे प्रकरण उघड होताच आरोपी अयान फरार झाला होता. मात्र पोलिसांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची चव्रे फिरवत त्याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

350 क्लिप व्हायरल

या प्रकरणाच्या तपासात सात तरुणींची नावे समोर आली असून आरोपीने तब्बल 350 व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याची माहितीही समोर आली आहे. तपास सुरू असल्याने या प्रकरणात परतवाडय़ाबाहेरच्या आणखी काही मुली अडकल्या असल्याची शक्यताही पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात एकच आरोपी नसून आणखी काहींचा समावेश असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.