
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या इंधन डेपोला भीषण आग लागली. या आगीत सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील हिंगलगंज येथील बांकरा सीमा चौकीवर ही घटना घडली. जगी राम असे मयत अधिकाऱ्याचे नाव आहे.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, ही सीमा चौकी बीएसएफच्या 77 व्या बटालियनच्या अखत्यारीत येते. या डेपोतून सुंदरबनच्या नदीकाठच्या भागात गस्त घालणाऱ्या बीएसएफच्या बोटींना इंधन पुरवले जाते. या डेपोत अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी बीएसएफचे सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) जगी राम हे डेपोच्या आतच अडकल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलीस आणि सुरक्षा दल चौकशी करत आहेत.

























































