
कायमस्वरूपी युद्धबंदीचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर आता इराण आणि अमेरिकेमध्ये दुसऱया फेरीची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. त्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले आहे. चर्चेतून माघार घेण्याची घोषणा करणाऱया इराणच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. इराणमध्ये शांती प्रस्थापित होणार की पुन्हा रण होणार हे आता पुढील काही तासांत ठरणार आहे.
इराणी जहाज अमेरिकेने केले जप्त
सोमवारी ओमानच्या समुद्रात एका इराणी जहाजावर हल्ला करून अमेरिकी नौदलाने ते जप्त केले. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. इराण-अमेरिकेमध्ये झालेल्या 14 दिवसांच्या युद्धविरामाची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊन कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी जगातील सर्वच देशांची इच्छा आहे. मात्र, इराणी बंदरांची नाकेबंदी उठवणार नाही. तसेच, करार न झाल्यास इराणमधील वीज प्रकल्प आणि पूल उडवणार, अशी धमकी ट्रम्प यांनी दिल्यामुळे तिढा वाढला आहे. ट्रम्प यांच्या अवास्तव मागण्या व धमक्या मान्य नसल्याचे सांगत इराणने दुसऱया फेरीच्या चर्चेला नकार दिला आहे. तरीही अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबादेत येत आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोहीम अद्याप संपलेली नाही! – नेतन्याहू
युद्धविरामाची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज मोठे विधान केले. इस्रायलने इराणमधील मिशन अद्याप पूर्ण केलेले नाही, असे नेतन्याहू म्हणाले. त्यामुळे इराण युद्ध पुन्हा भडकण्याची भीती कायम आहे. दरम्यान, इस्रायलच्या सैनिकाने येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याची तोडफोड केल्याच्या घटनेचा नेतन्याहू यांनी तीव्र निषेध केला आहे. संबंधित सैनिकावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
…तर पुन्हा बॉम्बचा वर्षाव करू! – ट्रम्प
ठरलेल्या वेळेत इराणने करार केला नाही तर पुन्हा एकदा बॉम्बवर्षाव केला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. ‘‘इराणचे प्रतिनिधी चर्चेला येतील की नाही माहीत नाही. त्यांनी खरेतर यायला हवे. त्यांनी नकार दिल्यानंतरही आमचे लोक चर्चेसाठी गेले आहेत. त्यामुळे ते येतील अशी अपेक्षा आहे. आमच्या मुख्य मागण्या कायम आहेत. इराणला अण्वस्त्र बाळगू देणार नाही म्हणजे नाही,’’ असेही ट्रम्प यांनी सांगितले.
रिव्होल्युशनरी गार्डने घेतला इराणचा ताबा
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या सशस्त्र संघटनेने संपूर्ण देशाचा ताबा घेतला. इराणचे लष्करी आणि सर्व राजकीय निर्णयदेखील यापुढे आयआरजीसी घेणार आहे. आयआरजीसीचे कमांडर अहमद वाहिदी यांच्याकडे आता इराणची सर्व सूत्रे असतील. इराणमधील मवाळ नेत्यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यात सध्याचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.
पाकिस्तानने ट्रम्प यांना सुनावले, होर्मुझची नाकेबंदी कायम तर चर्चा कठीण
होर्मुझभोवती नाकेबंदी कायम राहिल्यास इराणशी चर्चा होणे कठीण आहे, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले. युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुझ खुले करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, इराणी बंदरांवर जहाजे जाऊ न देण्याची भूमिका अमेरिकेने कायम ठेवली आहे. त्यामुळे चर्चेत अडथळा निर्माण झाला असून मुनीर यांनी आज हे निदर्शनास आणून दिले. त्यांच्या सल्ल्यावर विचार करण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे.































































