Share Market News – आखातात तणाव वाढला अन् शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी स्वाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होण्याच्या शक्यतेने गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर घसरले होते. तसेच शेअर बाजाराही सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशात तणाव वाढत असल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. त्यामुळे बुधवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

राष्ट्रीय शेअर बाजारात बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ६९९.७४ अंकांनी घसरून ७३,९५९.४८ वर आला तर निफ्टी १७७.४० अंकांनी घसरून २३,३०२.५० वर आला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, आयटीसी आणि इटरनल यांना सर्वाधिक नुकसान झाले. मागील काही सत्रांमधील वाढीनंतर नफावसुलीमुळे आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, मारुती, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स तेजीत राहिले. मंगळवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ८,३६२.९२ कोटींच्या शेअर्सची विक्री करून नफावसुली केली.

देशातील शेअर बाजारात घसरण झाली असली तरी आशियातील बाजारात तेजी दिसत आहे. आशिया-पॅसिफिक बाजारपेठा बुधवारी तेजीने उघडल्या. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.९१% ने वाढला, तर टोपीक्स निर्देशांक ०.९३% ने वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक फ्युचर्स २५,८५३ वर व्यवहार करत होता, जो त्याच्या मागील बंद भावाच्या २६,०३८.३२ पेक्षा कमी होता. दक्षिण कोरियाच्या बाजारपेठा सुट्टीमुळे बंद होत्या. अमेरिकन शेअर बाजाराच्या बेंचमार्कशी संबंधित फ्युचर्समध्ये फारसा बदल झाला नाही. एस अँड पी ५०० आणि नॅसडॅक १०० फ्युचर्स जवळपास स्थिर राहिले. दरम्यान, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजशी संबंधित फ्युचर्स सुमारे २ अंकांनी वाढले.

सलग चार सत्रांच्या घसरणीनंतर देशातील शेअर बाजार मंगळवारी तेजीसह बंद झाले. आयटी स्टॉक्समधील जोरदार खरेदीच्या जोरावर, बीएसई सेन्सेक्स ३८२.५० अंकांनी वाढून ७४,६४९.८४ अंकांवर बंद झाला. एनएसई निफ्टीदेखील १००.९५ अंकांनी, म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी वाढून २३,४८३.५५ अंकांवर बंद झाला.