
फिल्म हेरिटेज फाऊंडेशन ही संस्था शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी 2014 मध्ये स्थापन केलेली एक ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी संस्था आहे. चित्रपट वारशाचे संवर्धन, जतन आणि पुनर्स्थापना (रेस्टोरेशन) यासाठी कार्य करणे तसेच चित्रपट या माध्यमाची भाषा आणि त्याचे विविध पैलू यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम विकसित करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या संस्थेतर्फे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता कुलाबा येथील रीगल या आलिशान चित्रपटगृहात उत्तमोत्तम देशी-विदेशी चित्रपटांचे आयोजन केले जाते. हे सगळे चित्रपट रसिकांसाठी अगदी विनामूल्य आहेत. मात्र तिथे वेळेआधी पोहोचणे आवश्यक आहे. 6.30 वाजता प्रवेश बंद होतो.
4 जून रोजीचा चित्रपट आहे टेरेन्स मलिक यांचा ‘बॅडलॅन्ड्स’. 1973 सालचा हा उत्कंठावर्धक मर्डर मिस्ट्री सिनेमा अगदी चुकवू नये असाच. याच मालिकेत पुढच्या गुरुवारी म्हणजे 11 जून रोजी प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. अशा गाजलेल्या चित्रपटांचे मोठय़ा पडद्यावरील प्रदर्शन म्हणजे चित्रपट रसिकांना पर्वणीच. तरी सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने केले आहे.

























































