
जिल्हा पोलीस दलातील चालू वर्षाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उद्या (४ जून) पोलीस मुख्यालयात बदली दरबार आयोजित केला आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सुमारे ३०० पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
एका पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अंमलदारांकडून यापूर्वीच तीन पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागविण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, ३० एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर अंमलदारांच्या बदल्या रखडल्या होत्या. नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ही प्रक्रिया पुन्हा गतिमान केली आहे. बदलीपात्र अंमलदारांना उद्या (दि. ४) सकाळी ७:३० वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक अंमलदाराची भूमिका जाणून घेऊन तसेच त्यांच्या पसंतीच्या ठिकाणांचा विचार करून बदल्या करण्यात येणार असल्याचे समजते.
या प्रक्रियेत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावरील अंमलदारांचा समावेश आहे. एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले, एका तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १२ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले तसेच विविध शाखांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावलेले अंमलदार बदलीस पात्र ठरले आहेत.
४० पोलिसांना पदोन्नती
जिल्हा पोलीस दलातील काही पोलिसांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी २० पोलीस नाईकांना पोलीस हवालदारपदी, तर २० पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (सहायक फौजदार) पदावर पदोन्नती देण्याचे आदेश काढले आहेत. पदोन्नती मिळालेल्या पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

























































