गव्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; शित्तूर-वारुण परिसरात घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदोली परिसरातील शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथे शेतात गवत काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

यशवंत मारुती यादव (वय ७५) असे गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (दि. २) ही दुर्दैवी घटना घडली.

यशवंत यादव हे सकाळी आपल्या मालकीच्या ‘शिराळे-मळा’ येथील शेतात गुरांना वैरण (चारा) काढण्यासाठी गेले होते. ते उसात वैरण काढत असताना अचानक गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. गव्याने यादव यांना शिंगावर उचलून जमिनीवर आपटले आणि तुडवले. यावेळी यादव यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत तेथे आले. शेतकऱ्यांना पाहून गव्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

गंभीर जखमी यादव यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, शित्तूर-वारुण येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, कराडकडे जात असतानाच वाटेत यादव यांची प्राणज्योत मालवली.

चांदोली आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर कमालीचा वाढला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र चिंता व संताप व्यक्त होत आहे.