
दिल्लीच्या मालवीय नगरमधील फ्लरिश स्टे हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या हॉटेलला आग लागली त्यानंतर या हॉटेलचा मालक लवकेश बजाज याने हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी थांबण्याऐवजी तिथून पळून गेला. पळून गेल्यानंतर तो घरी न जाता अटकेच्या भीतीने तो दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी भटकत राहिला. लवकेश याला बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चौकशीदरम्यान त्याने ही कबूली दिली.
बजाजने तीन वर्षांपूर्वी अहलुवालिया नावाच्या व्यक्तीकडून हे हॉटेल विकत घेतले होते आणि तो तिथे हॉटेल व गेस्ट हाऊस चालवत होता. यापूर्वी या इमारतीत खादीचे दुकान होते. बजाजने चौकशीत पुढे सांगितले की, त्याने जेव्हा ही इमारत विकत घेतली, तेव्हापासूनच या इमारतीची अवस्था जर्जर झालेली होती. तसेच त्याने या इमारतीसाठी कधीच अग्निशामक दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (Fire Safety NOC)घेतली नव्हती, अशी कबुलीही दिली आहे.
दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ‘फ्लरिश स्टे’ हे हॉटेलला बुधवारी लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. मृतांमध्ये 17 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाज याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
10 पोलीसही जखमी
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आणताना 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले. मृतांपैकी 17 जण नायजेरिया, मोझांबिक, बांगलादेश, सोमालिया, लायबेरिया आणि अफगाणिस्तानातील असून त्यांची ओळख पटली आहे.


























































