वांद्रे तलावाचे पुनरुज्जीवन होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पश्चिम येथील 200 वर्षे जुने आणि ऐतिहासिक अशा स्वामी विवेकानंद सरोवराचे अर्थात वांद्रे तलावाचे लवकरच पुनरुज्जीवन होणार आहे. मुंबई महापालिकेकडून या तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. येत्या 12 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

वांद्रे परिसराची शान असलेला हा तलाव कचरा, शेवाळ आणि मातीने भरून गेला आहे. महापालिकेच्या एसडीपी विभागाच्या देखरेखीखाली तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तत्पूर्वी तलावातून 75 हजार घनमीटर पाणी काढण्यात आले आहे. त्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 2,951.2 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा स्थानिक आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी आज या कामाचा आढावा घेतला व पालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी वॉर्ड अध्यक्ष शुभांगी वेलकर, एच-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड व इतर अधिकारी उपस्थित होते.