
<<प्रसाद ताम्हनकर>>
आजच्या वेगवान डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या रूपात मानवी बुद्धिमत्तेलाच आव्हान देणारे एक समांतर जग उभे राहिले आहे. या बदलत्या प्रवाहात सध्या जागतिक बाजारपेठेत एकाच विषयाची सर्वात जास्त चर्चा आहे, ती म्हणजे एआयमुळे भविष्यातील नोकऱ्यांचे काय होणार? ताज्या संशोधनानुसार, भविष्यातील कामाचे स्वरूप आणि बाजारपेठ ही पूर्णपणे अशा लोकांच्या ताब्यात असणार आहे जे एआय तंत्रज्ञानावर हुकमत मिळवतील. याचाच अर्थ असा की, एआय माणसाला नोकरीवरून काढून टाकणार नाही, परंतु जो माणूस एआयचा वापर अत्यंत प्रभावीपणे आणि योग्य रीतीने करायला शिकेल, तो एआय न शिकणाऱया किंवा जुन्याच पद्धतींना चिकटून राहणाऱया माणसाची जागा नक्कीच हिरावून घेईल.
मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर प्रत्येक वेळी नवीन तंत्रज्ञान आल्यावर सुरुवातीला संशयाचे आणि विरोधाचे वातावरण निर्माण झाले, होते. नव्वदच्या दशकात जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांमध्ये संगणकाचा शिरकाव झाला, तेव्हा लाखो लोकांच्या नोकऱया जातील अशीच भीती व्यक्त केली जात होती. परंतु काळाच्या ओघात जे लोक संगणक शिकले, त्यांनी स्वतची प्रगती करून घेतली आणि ज्यांनी बदल नाकारला ते मागे पडले. आज हुबेहूब तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आज एआय केवळ फॅक्टरीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते थेट अकाऊंटिंग, पत्रकारिता आणि कोडिंगसारख्या वैचारिक क्षेत्रांमध्ये घुसले आहे. त्यामुळे आता प्रश्न नोकरी वाचवण्याचा नाही, तर स्वतला काळाशी सुसंगत ठेवत अधिक कुशल, सक्षम आणि काळाच्या दोन पावले पुढे असणारे बनवण्याचा आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे कामाच्या पारंपरिक पद्धती मुळापासून बदलत आहेत. पूर्वीच्या काळी एखाद्या कठीण कामासाठी तासन्तास बसून मेहनत करणे, मॅन्युअल डेटा एंट्री करणे किंवा लांबलचक रिपोर्ट तयार करणे हे कष्टाचे काम मानले जायचे, परंतु आता एआयच्या आगमनामुळे अशी साचेबद्ध आणि रटाळ कामे काही सेकंदांमध्ये पूर्ण होऊ लागली आहेत. परिणामी, कंपन्यांना आता अशा कर्मचाऱयांची मुळीच गरज भासणार नाही जे केवळ साचेबद्ध कामे करतात. बाजारपेठेत आता अशा चतुर आणि स्मार्ट लोकांची मागणी प्रचंड वाढणार आहे, जे एआय टूल्सचा वापर करून आपल्या कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही दहा पटीने वाढवतील व उरलेला वेळ व्यवसायाच्या धोरणात्मक विकासासाठी व नवनिर्मितीसाठी देतील. म्हणजेच, शारीरिक श्रमापेक्षा आता तंत्रज्ञानाच्या योग्य हाताळणीला, कल्पकतेला आणि मानवी बुद्धीला जास्त किंमत मिळणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत माणसाला एआयकडून अपेक्षित काम अचूक करून घेण्यासाठी त्याला योग्य त्या सूचना म्हणजेच कमांड्स देण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल, ज्याला प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग म्हटले जाते. जो माणूस एआयला जितक्या स्पष्ट आणि अचूक सूचना देऊ शकेल, त्याला तितकेच उत्कृष्ट निकाल मिळतील. त्यामुळे भविष्यात केवळ पदव्यांपेक्षा माणसाकडे तंत्रज्ञानाला नियंत्रित करण्याचे किती कौशल्य आहे, यावरच त्याची नोकरीतील पत आणि पगार ठरणार आहे. मात्र जर प्रत्येक छोटय़ा निर्णयासाठी माणूस पूर्णपणे एआयवरच विसंबून राहू लागला, तर मानवी मेंदूची सर्जनशीलता धोक्यात येण्याचा आणि लोक सभोवतालच्या खऱया समस्या विसरण्याचा मोठा धोकाही आहे. यामुळे भविष्यात तंत्रज्ञान माणसाला गुलाम बनवणार नाही ना, अशी रास्त भीतीही आता व्यक्त केली जात आहे.
आजची तरुण पिढी जर केवळ शॉर्टकट म्हणून एआयचा वापर करणार असेल, तर त्यांची प्रगती तात्पुरती ठरेल. कारण मूळ बुद्धिमत्ता ही मानवी मेंदूकडेच राहणार आहे. एआय हे केवळ तुमचे काम सोपे करणारे एक माध्यम आहे, तुमचा पर्याय नव्हे, हे सत्य प्रत्येकाने वेळेतच स्वीकारले पाहिजे. शेवटी एआय हे एका मोठय़ा वादळासारखे आहे, ज्याला रोखणे कोणाच्याही हातात नाही. अशा वेळी त्याला घाबरण्याऐवजी त्याचे रूपांतर एका मोठय़ा संधीत केले पाहिजे. येणारा काळ हा कष्टापेक्षा कौशल्याचा आणि वेगाचा असणार आहे. जे लोक वेळेची पावले ओळखून एआयवर हुकमत मिळवतील, तेच या नव्या जगात टिकून राहतील आणि राजासारखे राज्य करतील. त्यामुळे स्वतला सातत्याने अपडेट करणे आणि रोज नवीन तांत्रिक कौशल्ये शिकत राहणे हाच भविष्यात यशस्वी होण्याचा एकमात्र राजमार्ग आहे.


























































