
केंद्र सरकारच्या नव्या नियमाच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकर चालक आणि मालकांनी उद्या रविवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवार सकाळपासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालये, रेल्वे सेवा आणि इतर सार्वजनिक सेवांना मोठा फटका बसणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया तलांवात 14 टक्केच जलसाठा शिल्लक राहिल्याने 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. याचा फटका बसल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्पांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. बांधकाम प्रकल्पासाठी तर महापालिकेचे पाणी वापरण्यास बंदीच आहे. तर मुंबईत दररोज सुमारे 350 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो. या पाण्याचा वापर रस्ते धुणे, उद्यानांची देखभाल, बांधकाम प्रकल्प, खासगी गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, खासगी रुग्णालये, रेल्वे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सलून तसेच विविध कार्यालयांमध्ये केला जातो. मुंबईत प्रचंड प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. या सर्वांना टँकरने पाणी पुरवठा होतो.
असा आहे नवा नियम
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे पालन न करणाऱया टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ संपाचा निर्णय घेतला आहे.
सरकारसोबत चर्चा निष्फळ
मुंबईत सुमारे अडीच ते तीन हजारांपेक्षा अधिक खासगी पाणी टँकर पाण्याचा पुरवठा करीत आहे. आमच्या मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांपासून पालिका आयुक्तांनाही ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. अनेक बैठका होऊनही कोणताही तोडगा न निघाल्याने संपाचा निर्णय घेतल्याचे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबिर सिंग बिरा यांनी सांगितले.
…तर पालिकेच्या सेवेलाही फटका
या संपाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावरही होऊ शकतो. कारण पालिकेकडे स्वतःचे पाणी टँकर अत्यंत कमी आहेत आणि सध्या कोणतीही पर्यायी व्यवस्था तयार करण्यात आलेली नसल्याने याचा मोठा फटका अनेक सार्वजनिक सेवांना बसणार आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या मागणीसाठी मुंबईतील टँकर चालकांनी 2024 आणि 2025 मध्ये संप पुकारला होता.a
























































