किडनी विकणारा शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, राजकीय पक्षात असलेल्या सावकाराला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जापोटी स्वतःची किडनी विकणाऱ्या चंद्रपूरच्या रोशन कुळे या शेतकऱ्याला अजूनही न्याय मिळालेला नाही. त्याने तक्रार केलेल्या एका सावकाराला अजूनही पोलिसांनी चौकशीच्या बाहेर ठेवले असून, केवळ एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याला संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप रोशन कुळे याने केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मिंत्थूर येथील रहिवासी असलेल्या रोशन याने सावकारी कर्ज चुकते करण्यासाठी स्वतःची किडनी विकली आहे. या प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध आतापर्यंत कारवाई झाली आहे. मात्र दिवाकर निकुरे नावाच्या सावकाराला अजूनही अटक झालेली नाही. रोशन कुळे याने निकुरेला आठ लाख रुपये दिले असून, त्याचे सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. बँकेचे स्टेटमेंट, रिसिप्ट पोलिसांना दिले आहेत. पण तरीही त्याच्यावर कारवाई केली जात नाही किंवा साधे चौकशीलाही बोलावले गेले नाही.

दिवाकर निकुरे हा सावकारांच्या यादीतील एक महत्त्वाचे पात्र असून, तो काळा पैसा पांढरा करून देण्याचे काम करतो, असा आरोप रोशन कुळे याने केला आहे. जबरदस्तीने बळकावलेल्या माझ्या शेताचे पैसेही याच निकुरेच्या नावाने मी बँकेत जमा केले. त्याची पावती माझ्याकडे आहे. याची तक्रार पोलिसात केल्यावरही त्याची चौकशी केली जात नाही, असा आरोप रोशनने केला आहे. या सावकारांच्या विरोधात माझा लढा सुरूच राहील, असेही रोशन म्हणाला.