
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सदर प्रवासी बँकॉकहून मुंबईत आला होता. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत 29 दुर्मिळ वन्यजीव आढळले. सर्व प्राण्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीची चौकशी सुरू आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानी नागरिक असलेला आरोपी बँकॉकहून मुंबईत आला होता. मुंबई विमानतळावर तपासणीदरम्यान सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी आरोपीच्या बॅगेची तपासणी केली असता आत 29 दुर्मिळ प्राणी लहान कंटेनर आणि पॅकेजिंगमध्ये लपवलेले आढळे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्राणी ताब्यात घेतले.
बॅगेत गिबनसारखा दिसणारा एक वानर, एक काळ्या रंगाची खार, एक बॉल पायथॉन आणि एक इग्वाना यांसारख्या प्राण्यांचा समावेश होता. घटना उघड होताच तात्काळ एका बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यात रेस्कइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि वन विभागाच्या तज्ञांचा समावेश आहे.
या तस्करीमध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे. नियमांनुसार आणि डीजीसीए व वन्यजीव संवर्धन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्यांना ज्या देशातून बेकायदेशीरपणे आयात करण्यात आले होते, त्या देशात परत पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.




























































