
स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर निर्जनस्थळी बोलावून जीवघेणा हल्ला करत लुटायचे, अशा आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. रायगडच्या एका व्यावसायिकाला तब्बल ५२ लाख ८० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोकड, सोन्याचे दागिने, स्विफ्ट कार, बनावट सोन्याची नाणी आणि घातक शस्त्रांसह २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते (वय ५२), राजू उर्फ चंदू रामदास मोहिते (वय ३६), अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते (वय २७), छगन दशरथ मोहिते (वय ३६) (सर्व रा. जिल्हा नांदेड) आणि दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा. जिल्हा यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश अनिल नलावडे (रा. सणसवाडी, ता. मानगाव, जि. रायगड) हे व्यावसायिक आहेत. आरोपी राजू मोहिते आणि अक्षय मोहिते हे काही काळापूर्वी नलावडे यांच्याकडे कामाला असल्याने त्यांची ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी नलावडे यांचा विश्वास संपादन केला. आपल्याकडे स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात सोने उपलब्ध असल्याचे सांगून त्यांनी नलावडे यांना सोने खरेदीच्या जाळ्यात ओढले.
४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपींनी सोने खरेदीच्या व्यवहारासाठी नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांना अहिल्यानगर तालुक्यातील बुरुगाव शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ बोलावले. तिथून त्यांना एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या टोळीतील इतर सदस्यांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या मारहाणीत नलावडे व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील ५२ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला.
या घटनेनंतर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील दरोडा आणि फसवणुकीच्या कलमांनुसार गुन्हा (रजि. नं. ४९६/२०२६) दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आरोपींच्या अटकेचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झेंडीगुळा लोणी येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकून पाचही जणांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १६ लाख ५० हजार रुपये रोकड, १ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांची स्विफ्ट कार, बनावट सोन्याची नाणी आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता असा एकूण २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी अशाच प्रकारे संघटित गुन्हेगारी करत असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि उर्वरित मुद्देमालाचा तपास सुरू असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.




























































