
नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्याने 9 जूनपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अनुमान आहे. परंतु 15 जूनपर्यंत तरी राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग दाटून विखुरलेल्या स्वरूपात वादळी पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र तो पाऊस पेरणीसाठी पोषक ठरेल अशी परिस्थिती नाही असे राज्य शासनाने म्हटले आहे.
कमी-अधिक पावसामुळे 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खान्देशात 40 अंश तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षात ‘अल निनो’चा प्रभाव असल्याने सरासरी पाऊस 92 टक्के असला तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये आणि त्यांचे नुकसान होऊ नये असा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
कडकडाटावेळी विजेच्या खांबांजवळ थांबू नका
विजांचा कडकडाट सुरू असताना शेतकरी आणि नागरिकांनी झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा
ट्रान्सफॉर्मरजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.



























































