
फुटबॉलचा वर्ल्ड कप म्हणजे फक्त विजेता ठरवणारी स्पर्धा नव्हे. तो प्रतिभांना अमरत्व देणारा महायज्ञ असतो. चार वर्षांतून एकदा रंगणाऱया या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात काही खेळाडू चेंडूला लाथ मारत नाहीत, तर थेट आपल्या नशिबालाच किक मारतात. एका महिन्यात एखादा अनोळखी तरुण जगभरातील लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करू लागतो. एखाद्याची बाजारमूल्ये आकाशाला भिडतात, तर एखादा पुढचा ‘बॅलन डी’ओर’ विजेता म्हणून चर्चेत येतो. त्यामुळे यंदाचा फिफा गाजवण्यासाठी असे नवे सुपरस्टार सज्ज झाले आहेत. क्रीडा जगताला या नव्या स्टार्सची स्पर्धेच्या पहिल्या आठवडय़ातच ओळख होईल.
उद्या 11 जूनच्या मध्यरात्री अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे सुरू होणारा फिफा वर्ल्ड कप अशाच काही नव्या चेहऱयांच्या उदयाचा साक्षीदार ठरू शकतो. जगातील फुटबॉलतज्ञांची नजर अशा दहा खेळाडूंवर खिळली आहे, ज्यांचे करिअर पुढील काही आठवडय़ांत पूर्णपणे बदलू शकते. फुटबॉलच्या इतिहासात अनेक खेळाडूंना वर्ल्ड कपने प्रसिद्ध केले आहे. काही आठवडय़ांच्या या स्पर्धेत करिअरची दिशा बदलते आणि जगभरातील चाहत्यांची मने जिंकली जातात. फिफा वर्ल्ड कप हा फक्त विजेतेपदासाठीचा संघर्ष नसेल. तो उद्याच्या सुपरस्टार्सच्या जन्माचा उत्सवही असेल.
तुर्कस्तानची दुहेरी तोफ
अर्दा गुलेर आणि केनन यिल्डिज़ ही तुर्कस्तानची दोन धगधगती अस्त्रs आहेत. गुलेर हा कल्पकतेचा कारखाना आहे. मैदानावर त्याचा मेंदू इतरांपेक्षा दोन पावले पुढे धावत असतो. तुर्कस्तानच्या नव्या पिढीतील सर्वात मोठी आशा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. दुसरीकडे यिल्डिज हा युरोपातील सर्वात वेगाने उदयाला येणाऱया आक्रमक खेळाडूंमध्ये गणला जातो. मोठय़ा सामन्यांमध्ये मोठे खेळाडू घडतात आणि यिल्डिजकडे ती क्षमता भरपूर आहे.
फ्रान्सची पुढची पिढी सज्ज
फ्रान्सकडे प्रतिभेची खाण आहे. त्यातून दोन रत्ने विशेष चमकत आहेत. वॉरेन जायर-एमरी हा फ्रान्सच्या मध्यफळीचा भावी सेनापती मानला जातो. जागेसाठी तीव्र स्पर्धा असतानाही त्याने स्वतःची छाप निर्माण केली आहे. तर डेसिरे डौए हा अनेक युरोपीय स्काऊट्सच्या वहीत लाल अक्षरांनी लिहिलेला खेळाडू आहे. त्याची गती, काwशल्य आणि धाडस यामुळे तो वर्ल्ड कपमधील चर्चेचा विषय ठरू शकतो.
सेस्को – छोटय़ा देशाची मोठी आशा
स्लोवेनियाचा बेंजामिन सेस्को हा फक्त स्ट्रायकर नाही, तर एका देशाच्या स्वप्नांचा भार वाहणारा खेळाडू आहे. त्याची उंची, ताकद आणि गोलसमोरची निर्दयता मोठय़ा संघांनाही धक्का देऊ शकते. वर्ल्ड कपमध्ये संघाचा नायक बनण्याची क्षमता त्याच्यात आहे.
अमौरा – आफ्रिकेचा स्पह्टक चेहरा
अल्जीरियाचा मोहम्मद अमौरा हा आफ्रिकेतील सर्वात धोकादायक आक्रमक खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याचा वेग आणि गोल करण्याची भूक प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरते. मोठय़ा मंचावर चमकण्याची वेळ आता त्याच्यासमोर उभी आहे.
अर्जेंटिनाचा पुढचा वारसदार
लिओनेल मेस्सीनंतर अर्जेंटिनाच्या भविष्यातील चेहऱयाबद्दल चर्चा होते तेव्हा फ्रेंको मास्टंटुओनो हे नाव हमखास पुढे येते. अवघ्या 18 वर्षांचा हा तरुण स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडूंमध्ये असेल. पण त्याच्या खेळात वयापेक्षा खूप मोठी परिपक्वता दिसते. अर्जेंटिनाचा पुढचा महानायक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
सँटियागो हा मेक्सिकोचा नवा चेहरा
मेजबान देशाच्या अपेक्षांचे ओझे फार मोठे असते. सँटियागो जिमेनेज हे ते ओझे खांद्यावर घेऊन मैदानात उतरणार आहेत. मेक्सिकोला जर घरच्या मैदानावर यश मिळाले तर जिमेनेज एका रात्रीत राष्ट्रीय नायक ठरू शकतो.
यमल – स्पेनचा सोन्याचा मुलगा
अवघ्या 18 वर्षांचा लॅमिन यमल आधीच फुटबॉल विश्वाचे आकर्षण ठरला आहे. चेंडू पायाशी आला की तो जणू एखाद्या चित्रकाराप्रमाणे पॅनव्हासवर रंग उधळतो. स्पेनला जर मोठे यश मिळाले तर यमल थेट ‘बॅलन डी’ओर’च्या शर्यतीत झेपावू शकतो. एवढय़ा कमी वयात अशी चर्चा होणेही मोठय़ा प्रतिभेची साक्ष आहे.
एंड्रिक ः ब्राझीलचा नवा चमत्कार
ब्राझीलमध्ये प्रतिभा उगवते ती जणू पावसाळ्यातील गवतासारखी. पण त्यातही एंड्रिक वेगळा भासतो. 19 वर्षीय हा वंडरबॉय दक्षिण अमेरिकेत चर्चेत आहे. मात्र वर्ल्ड कप हे त्याच्यासाठी सुवर्णद्वार ठरू शकते. नेमारनंतर ब्राझीलच्या नव्या चेहऱयाचा शोध संपवण्याची ताकद त्याच्यात आहे.






























































