पाणी जपून वापरा… फक्त 12 टक्के जलसाठा शिल्लक, तलावांनी तळ गाठला, आता विहिरींतील पाण्याचा पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया तलावांमध्ये फक्त 12 टक्केच पाणी शिल्लक राहिले असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त केल्याने मुंबईवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे सर्व वॉर्डमधील विहिरींचा शोध घेऊन त्या स्वच्छ कराव्यात आणि गृहनिर्माण सोसायटय़ांशी समन्वय साधून पाण्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व 24 वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना आज दिले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील खालावलेला जलसाठा आणि पावसाळापूर्व कामांसंदर्भात पालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालिकेत मॅरेथॉन बैठक पार पडली. यावेळी आयुक्तांनी मुंबई महानगरातील सर्व विहिरींची तातडीने पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. विहिरींमधील गाळ व कचरा काढून त्यांची स्वच्छता करावी. पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची (Recharge) व्यवस्था उभारावी, अशा सूचना केल्या. खासगी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्याचा वापर करावा. यासाठी स्थानिक नगरसेवक, प्रशासन आणि गृहनिर्माण संस्था यांनी समन्वय साधावा, स्थानिक नगरसेवकांच्या सहभागातून विहिरींच्या परिसरातील गृहनिर्माण संस्थांशी समन्वय साधून या विहिरींतील पाण्याचा वापर करण्यास त्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

तीन वर्षांतील 11 जूनचे पाणीसाठा

2026 175465 12.12 टक्के
2025 141867 9.80 टक्के
2024 81623 5.64 टक्के

वाढती लोकसंख्या आणि हवामानातील बदलांमुळे पाणी व्यवस्थापन आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे मुंबईतील जलसाठय़ाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. – अश्विनी भिडे, पालिका आयुक्त

जलसाठय़ाची सद्यस्थिती

 मुंबईला सात धरणांमधून दररोज 4100 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जलसाठा कमी झाल्याने 15 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईला सध्या 3800 दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे.

 मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणात सध्या 175465 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याचा पाणी पुरवठा पाहता हे पाणी 26 जुलैपर्यंत पुरणारे आहे.