एसटी कामगारांच्या थकीत देयकांचा प्रश्न ‘जैसे थे, संयुक्त कृती समिती आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कामगारांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र दहा वर्षांपासून थकीत असलेल्या देयकांचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष कायम आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती येत्या 15 जूनपासून तीन टप्प्यांत आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका समितीतर्फे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी जाहीर केली.

कामगारांच्या विविध आर्थिक प्रश्नांबाबत गुरुवारी संयुक्त कृती समितीसोबत परिवहन मंत्र्यांनी घेतलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीकडे आशेने बघणाऱया तमाम एसटी कामगारांचा हिरमोड झाला असून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती आंदोलनावर ठाम आहे. चर्चेच्या माध्यमातून सामंजस्याने न मिळणाऱया एसटी कामगारांच्या हक्कासाठी आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा हिरेन रेडकर यांनी दिला. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनीही सरकारच्या अनास्थेवर संतप्त प्रतिक्रिया दिली. परिवहन मंत्र्यांनी पाच टक्के वाढीव महागाई भत्ता जाहीर केला असला तरी कामगारांची तब्बल दहा वर्षांची देणी बाकी आहेत, असे ते म्हणाले.