
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपलेली असतानाही महायुतीत नाराजीनाटय़ सुरू आहे. यामुळे बंडखोरी करणाऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात असून नाशिकमध्ये बऱ्याच प्रयत्नांनंतर भाजप बंडखोर गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याने नरेंद्र दराडे यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे, पण जळगावात शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांचे बंड कायम असल्याने भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांची धाकधूक वाढली आहे.
नाशिकमध्ये शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक गोकुळ गीते यांनी बंडखोरी केल्याने महायुतीपुढे आव्हान निर्माण झाले होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेकांचा गीते यांना पाठिंबा मिळत असल्याने दराडे यांची उमेदवारी धोक्यात आली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर आणि मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या मनधरणीनंतर गीते यांनी माघार घेतली आहे.
मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागणार
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अधिकृत दिवस आधीच उलटून गेल्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा गोकुळ गीते यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया प्रशासनाला पार पाडावीच लागणार आहे, परंतु गीते यांनी अधिकृतपणे आपला प्रचार थांबवून दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या मतांची फाटाफूट आता टळली आहे.
जळगावमध्ये मतांच्या फाटाफुटीचा धोका
जळगावमध्ये भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि शिवसेनेकडून शरद तायडे तर शिंदे गटाच्या रेश्मा काळे रिंगणात आहेत. रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुतीच्या मतांमध्ये फाटाफुटीचा धोका आहे. काळे यांनी भाजपचे नगरसेवक संपका&त असल्याचा दावा केल्याने महाजन यांची धाकधूक वाढली आहे.


























































