
अंधेरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांना अडसर ठरणाऱ्या 63 झाडांची छाटणी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याप्रकरणी संबंधित जाहिरात कंपनीवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यू लिंक रोड परिसरातील जाहिरात फलकांकरिता झाडांच्या फांद्या मोठय़ा प्रमाणात छाटण्यात आल्या. ही बाब उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेवक रूपेश सावरकर यांनी मांडली. याबाबत परिमंडळ कार्यालय आणि आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही एफआयआर दाखल झालेला नाही, असेही निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर संबंधित होर्डिंगच्या परवानग्यांची तपासणी करा तसेच जाहिरात कंपनीवर एफआयआर दाखल करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले.



























































