
‘पावसाने झोडपले तर दाद मागायची कोणाकडे’ अशी एक म्हण आहे आणि ती हिंदुस्थानबाबत तंतोतंत खरी ठरली. हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाने अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात तब्बल 349 धावांपर्यंत मजल मारली होती. पण पावसाने यावेळी हिंदुस्थानी संघाचा घात केला. पावसाचे आगमन झाले तेव्हा अफगाणिस्तानच्या संघाने 25.5 2 बाद 177 अशी मजल मारली होती. पण डकवर्थ-लुईस नियमानुसार त्यांना 25.5 षटकांत 174 धावा विजयासाठी हव्या होत्या. त्यामुळे या नियमानुसार त्यांना चार धावांनी विजयी घोषित करण्यात आले. हिंदुस्थानचा हा या तिरंगी मालिकेतील पहिलाच पराभव आहे. यापूर्वी त्यांनी यजमान श्रीलंकेला धूळ चारली होती.
प्रथम फलंदाजी करणाऱया हिंदुस्थानच्या संघाला वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी दणक्यात सुरुवात करून दिली. वैभवने फक्त 22 चेंडूंत 9 चौकारांच्या जोरावर 44 धावा केल्या, पण प्रभसिमरन मात्र टिकून राहीला आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. प्रभसिमरनने या सामन्यात 69 चेंडूंत 14 चौकारांच्या जोरावर 84 धावा फटकावल्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 84 चेंडूंत 66 आणि कर्णधार तिलक वर्माने 73 चेंडूंत 66 धावा करत संघाला तीनशेचा पल्ला गाठून दिला. पण अखेरच्या षटकात धडाकेबाज फटकेबाजी केली ती सूर्यांश शेडगेने.
सूर्यांशने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. सूर्यांशने यावेळी 27 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 40 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून अबदोल्लाह अहमदझाईने पाच विकेट घेतल्या. हिंदुस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी 69 धावांत दोन फलंदाज गमावले होते. पण त्यानंतर कर्णधार इम्रान (नाबाद 75) आणि बाहिर शाह (नाबाद 51) यांनी संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला आणि ते विजयाचे शिल्पकार ठरले.


























































