एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता,सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता वाढत जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी या बैठकीत दिलासादायक निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातदेखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या ‘वाहतूक भवन’ मुख्यालयात एसटी कर्माचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक आयोजित केली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

भविष्यात शासकीय कर्मचाऱयांना महागाई भत्ता लागू होताच तो तत्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱयांनाही लागू करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाईल असेही स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कर्मचारी संघटनांची समिती स्थापन करणार

महामंडळाच्या सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती तातडीने स्थापन करण्यात यावी आणि उत्पन्नवाढीसाठी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई आणि अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरुद्ध राज्यभर हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेतून एसटीच्या उत्पन्नात भर पडली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सदाभाऊ खोत, पडळकर एमडींच्या अंगावर धावले

या बैठकीत भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. सांगलीतील विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यावर नुकताच स्थानिक खरेदी प्रक्रियेत नियमबाह्य कारभार केल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यांच्या चौकशीची मागणी पडळकर यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली होती. त्याची चौकशी सुरू असतानाही पडळकर यांनी कुसेकर हे गोखले यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आक्रमक झाले. दहा दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करत असताना कुसेकर यांनी एकदाही त्यांची भेट घेतली नाही असा आरोप खोत यांनी केला आणि दोघेही कुसेकर यांच्यावर संतापल्याने बैठकीत गोंधळ झाला होता. प्रशासनाकडून केवळ 58 टक्के डीए झाला असे सांगून बैठक गुंडाळण्याचा प्रयत्न होत होता आणि कामगारांच्या इतर प्रश्नांबाबत मात्र कोणतीही ठोस चर्चा होत नव्हती. त्यामुळे संयम सुटल्याचा दावा बैठकीनंतर बोलताना पडळकर आणि खोत यांनी केला.