विरारच्या म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचा पालिकेवर मोर्चा, पाणीटंचाईवरून नागरिकांच्या संतापाचा स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीव्र पाणीटंचाईवरून आज विरार-बोळिंजमधील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील रहिवाश्यांच्या संतापाचा स्फोट झाला. सरकारने घरांची विक्री करताना २४ तास पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांनी पालिकेवर धडक देत आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत रहिवाशांनी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.

घर विक्री करत असताना म्हाडाने २४ तास पाण्याचे वचन दिले होते. परंतु २४ तास नाहीतर २४ मिनिटेदेखील पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. म्हाडा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनदेखील समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. तसेच महानगरपालिकेदेखील याकडे दुर्लक्ष करत आहे. या वसाहतीत १ हजार ५०० इतक्या सदनिका असून यातील ८ हजार ३०० सदनिकेत नागरिक वास्तव्यास आहेत.

रात्री साडेबारा वाजता पाणी येते मात्र तेही पुरेसे पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे महिन्यातून अनेकदा वीजपुरवठा खंडित किंवा तांत्रिक बिघाडाचे कारण देत पाणीपुरवठा बंद असतो, असे म्हाडा संकुल समितीचे उपाध्यक्ष कृष्णा देवाडिगा यांनी सांगितले. त्यामुळे आज पालिकेवर मोर्चा काढून निषेध करण्यात आला.